भाविपच्या राष्ट्रीय समूह गान स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठानचे गुजराथमध्ये यश

क्षेत्रीय स्पर्धेत मिळवले द्वितीय पारितोषिक
जळगाव (प्रतिनिधी) : भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय चेतना के स्वर समूहगान स्पर्धेत भुज (गुजराथ) येथे झालेल्या क्षेत्रीय स्तरावर जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय पारितोषिक मिळवले आहे. जळगाव येथे झालेल्या स्थानिक स्पर्धेत या संघाने प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पदासह हिंदी व लोकगीतासाठी दोन प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह विजेत्या पदाची हॅट्रिक केली होती.
लातूर येथे झालेल्या प्रांतस्तरीय स्पर्धेतही विवेकानंद प्रतिष्ठानच्या या संघाने विजेतेपद मिळविल्यामुळे त्यांची क्षेत्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. भुज येथे झालेल्या क्षेत्रीय स्पर्धेत महाराष्ट्र गुजरात व गोवा या राज्यातील सर्व प्रांत स्तरावर विजयी झालेले दहा संघ सहभागी झाले होते. त्यात विवेकानंद प्रतिष्ठानच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
विजयी संघात संहिता जोशी, जागृती कोळी, ऋतुजा विसावे, समीक्षा चौधरी, काव्या पवार, खुशी पाटील, विधी सोनवणे, हंसिका सोनवणे या विद्यार्थिनींचा समावेश होता. संगीत दिग्दर्शन सुयोग गुरव यांचे तर वाद्य साथ संगत रोहित बोरसे यांनी केली. ग्रीष्मा लोखंडे व चंदन चौधरी यांचे सहकार्य लाभले. क्षेत्रीय स्पर्धेस भारत विकास परिषदेचे विशाल चोरडिया व अनिरुद्ध कोटस्थाने (जळगाव) यांची विशेष उपस्थिती होती.
विजयी संघाचे केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सचिव विनोद पाटील आणि मुख्याध्यापक संतोष चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.




