
आर्यन मॅन सी.ए.प्रतीक मणियार यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) : कोणतेही अशक्य वाटणारे ध्येय प्राप्त करण्यासाठी शिस्त, परिश्रम आणि सातत्य गरजेचे आहे असे आर्यन मॅन बहुमान विजेते सी.ए.प्रतीक मणियार यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष गौरव सफळे, सचिव देवेश कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत रोटरी वेस्टचे सदस्य असलेल्या प्रतीक मणियार यांनी यश प्राप्त केल्याबद्दल रोटरी जळगाव वेस्टतर्फे त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन प्रकारचा समावेश असलेल्या आर्यन मॅन स्पर्धेविषयी माहिती देत मणियार यांनी त्याचे नियम सांगून कशी तयारी केली ते सांगितले.
या तीन वर्षांच्या प्रवासात योग्य प्रशिक्षक व योग्य प्रशिक्षण मिळाले आणि फिटनेस व आहार या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असे सांगून त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. नकारात्मक विचार मनात येऊन देता मनोधैर्य कायम टिकविले व व्यवस्थित पूर्वाअभ्यास केला तर या स्पर्धेत यश मिळविता येते असे सांगून मणियार यांनी हाफ व फुल आर्यन मॅन स्पर्धेतील फरक सांगितला.
स्पर्धेतील सहभागामुळे त्यांनी व्यावसायिक जीवनात व दैनंदिन कामात ऊर्जा मिळते, कार्यक्षमतेत वाढ होते व लक्ष केंद्रित होऊन यश प्राप्त होते असे सांगितले. शेवटी प्रश्न – उत्तरांच्या सत्रात श्रोत्यांच्या शंका निरसन केल्या.




