‘सरळ सेवा भरती २०२३’ – प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पदस्थापना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत सरळ सेवा पद भरती २०२३ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीतील १० उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांवर पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदस्थापनामध्ये ६ कनिष्ठ सहाय्यक, ३ आरोग्य सेवक आणि १ औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश असून, या सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित विभागांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ च्या कर्मचारी यांच्या रिक्त पदांचा ऐरणीवर असलेला प्रश्न यामुळे सुटला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, “जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील रिक्त पदे भरल्यामुळे प्रशासनाचे कामकाज अधिक सक्षम व कार्यक्षम होईल. तसेच विविध विभागांतील सेवा पुरवठा अधिक गतिमान होईल.” या पदस्थापनामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेला बळकटी मिळून विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे




