आमदार एकनाथराव खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघांना अटक!

तीन फरार; पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना रामानंद नगर पोलीस स्टेशन पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन जण फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दिली.
जळगावातील शिवराम नगर येथील माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात रामानंद नगर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून तब्बल 6 लाख 21 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, तर मुख्य आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. 27 रात्रीपासून 28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत मुक्ताई बंगला बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी चेतन सुरेश देशमुख यांनी फिर्याद दिल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकांनी सुरू केला.
6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली सुजुकी बर्गमन दुचाकी (MH-19-ER-5539) सापडली. या वाहनाच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले असता, त्याने आपल्या नातेवाईकांनी चोरी केल्याचे उघड केले. त्यावरून आरोपी जियाउद्दीन हुस्नोददीन शेख (वय 39, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपासात आरोपींनी चोरीचा मुद्देमाल उल्हासनगर येथील सोनाराकडे विकल्याचे समोर आले. पोलिसांनी मुंबई गाठून संशयित चिराग इकबाल सैय्यद (वय 22, रा. उल्हासनगर) व कैलास हिराचंद खंडेलवार (वय 48, रा. कल्याण) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अजून तीन मुख्य आरोपी फरार
या मुद्देमालात 31.970 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, विविध सोन्याचे दागिने, अंगठ्या, चैन, कानातील रिंग तसेच 217 ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती समाविष्ट आहे. अजून तीन मुख्य आरोपी मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि ‘बाबा’ (पूर्ण नाव माहीत नाही) हे उल्हासनगर, मुंबई येथील असून ते फरार आहेत. या आरोपींविरुद्ध मुंबई व गुजरात राज्यातील विविध ठाण्यांमध्ये 20 पेक्षा अधिक चोरी आणि घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत.
यांनी केली कारवाई
रामानंद नगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून हे यश मिळवले. या गुन्ह्याचा शोधात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हेमंत कळसकर आणि पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील यांनी मोलाची कामगिरी केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन रणेशवरे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, विनोद सुर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बागल, अक्रम शेख, प्रितम पाटील आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणेशवरे हे करीत आहेत.




