
स्थानिक पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून घेतले ताब्यात; चोरलेले १२ लाखांचे सोने हस्तगत
जळगाव, (प्रतिनिधी) : रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जुन्या अपहार प्रकरणात तब्बल ८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक पोलिसांनी वाराणसी, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अपहार केलेली ११ लाख ९० हजार किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड देखील हस्तगत करण्यात आली आहे.
30 तोळे वजनाचे सोने घेऊन कामगार फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा ३० मार्च २०१७ रोजी दाखल झाला होता. फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर एल कॉलनी गांधी नगर, जळगाव) यांच्या पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट येथील ‘साई ज्वेलर्स’ या दुकानात काम करणारा कामगार सुशांत सुनील कुंडू याने दागिने बनवण्यासाठी दिलेले एकूण 30 तोळे वजनाचे सोने घेऊन आपले मूळ गाव पश्चिम बंगाल येथे पलायन केले होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा वेळोवेळी शोध घेतला, परंतु तो मिळून आला नव्हता आणि गुन्हा तपासावर कायम होता.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व रामानंद नगर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या जुन्या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित केले. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सपोनि भुषण कोते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शोध घेण्यासाठी रवाना झाले. पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर फरार आरोपी सुशांत सुनील कुंडू (वय-३९, रा. नस्कर पारा, संत्रागाच्छी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) यास वाराणसी, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि भुषण कोते यांनी सुरू ठेवला. त्यांच्या तपासानुसार, आरोपीकडून कोलकाता, पश्चिम बंगाल येथून अंदाजे ११ लाख ९० हजार किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.




