ताज्या बातम्या

अपघातातील जखमी तरुणाची जीवघेण्या दुर्मिळ ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’वर मात !

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील डॉक्टरांच्या समर्पित आणि समन्वयी टीमने अपघातातील जखमी एका ३५ वर्षीय रुग्णाच्या जीवघेण्या ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’ या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या स्थितीवर यशस्वीरित्या मात करत, त्याचे प्राण वाचवले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे, कारण या गंभीर स्थितीचे उपचार व्यवस्थापन उच्चस्तरीय वैद्यकीय केंद्रांमध्येही दुर्मिळ असते.

पंकज गोपाळ (वय ३५) यांचे मलकापूर महामार्गावर झालेल्या एका जबर अपघातात दोन्ही मांडीच्या हाडांचे गंभीर फ्रॅक्चर झाले होते. अपघातानंतर तीन दिवसांनी, बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयातून त्यांना श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागल्याने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे हलवण्यात आले. येथे औषधवैद्यकशास्त्र आणि अस्थिव्यंगोपचार विभागात तपासणीअंती, रुग्णामध्ये फॅट एम्बॉलिझम सिंड्रोमची तीव्र लक्षणे आढळली.

अचूक देखरेखीमुळे रुग्णाची प्रकृती स्थिर

ज्यात श्वास घेण्यास त्रास, तीव्र ऑक्सिजन कमतरता, आणि हृदयगती वाढणे यांचा समावेश होता. ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’ मध्ये फ्रॅक्चर झालेल्या हाडातून फॅटचे कण रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि फुफ्फुसे व मेंदूपर्यंत पोहोचून जीवघेणी परिस्थिती निर्माण करतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अस्थिव्यंगोपचार, औषधोपाचारशास्त्र आणि बधिरीकरण विभागाच्या टीमने तातडीने कार्यवाही केली. रुग्णास त्वरित अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याला बायपॅप व्हेंटिलेटरी सपोर्ट देण्यात आला आणि अँटिकोअग्युलेशन, ऑक्सिजन थेरपी तसेच हेमोडायनॅमिक मॉनिटरिंग सुरू करण्यात आले. तीव्र रक्तक्षय आणि हिमोलायसिस असूनही, डॉक्टरांनी केलेल्या योग्य वेळी रक्तसंचार व्यवस्थापनामुळे आणि अचूक देखरेखीमुळे रुग्णाची प्रकृती स्थिर झाली.

रुग्ण पूर्णपणे झाला बरा

रुग्णाची वैद्यकीय स्थिती सुधारल्यानंतर, डॉक्टरांसमोर दुसरे मोठे आव्हान उभे होते. दोन्ही मांडीच्या हाडांचे फ्रॅक्चर. ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’ चा धोका नुकताच टळलेल्या रुग्णावरसाडेपाच तासांची अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’ आणि दुहेरी फ्रॅक्चर या दुहेरी आव्हानावर वैद्यकीय टीमने यशस्वीरीत्या मात केली. सध्या, रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तो सामान्य श्वासोच्छ्वास घेत आहे आणि त्याचे ऑक्सिजन स्थिर आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो फिजिओथेरपीच्या मदतीने चालण्यासही सुरुवात करत आहे.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले टीमचे अभिनंदन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी या संपूर्ण उपचारात सक्रिय मार्गदर्शन केले. त्यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. पंकज घोगरे, डॉ. सुमित पाटील, डॉ. नितीन प्रजापत, डॉ. विशाल टापरे, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. यश बोंडे, डॉ. हनुमंत काळे, डॉ. अमोल कुऱ्हे, डॉ. साईनाथ जगताप, डॉ. तौसिफ सय्यद तसेच भूलतज्ज्ञ विभागप्रमुख प्रा. डॉ. अमित हिवरकर, डॉ. अंजू पॉल, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पाराजी बाचेवार, प्रा. डॉ. नेहा भंगाळे, डॉ. मयूर भोसले, व अतिदक्षता विभागाच्या परिचारिका, कर्मचारी या सर्वांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button