भारतीय जनता पार्टीतर्फे माजी खा. उन्मेष पाटील यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून कारवाईची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर येथील शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान माजी खा.उन्मेष पाटील यांनी प्रशासकीय कार्यालयात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करत विद्यमान खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले. त्यामुळे शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महिला मोर्चातर्फे माजी खा. उन्मेष पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
खासदार स्मिताताई वाघ यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून नारीशक्तीचा अपमान केला आहे, त्याबद्दल या प्रकरणाची सखोल चौकशी होवून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याच्या महिला मोर्चा अध्यक्षा कृतिकाताई आफ्रे यांनी केली.
माजी खा. पाटील हे राजकीय कुंभकर्ण आहेत. ते सहा महिने झोप घेतात, आणि जाग आल्यावर मोठ्या नेत्यांवर तोंडसुख घेवून स्वस्त प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न करतात. लोकसभेत पराभव झाल्यावर झोपले ते विधानसभा जवळ आल्यावर जाग आली,विधानसभा हरल्यावर पुन्हा गायब झाले ,आता त्यांची पायाखालची वाळू सरकू लागल्याने अश्या प्रकारचे कारनामे ते अधून मधून करत राहतात. त्यांनी उबाठाच्या महिलाविरोधी संस्कृती ला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, असे भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.
त्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान केलेले बेताल वक्तव्य करणे हे न शोभणारे आहे. तसेच एका महिला खासदाराबद्दल अश्या आपत्तीजनक भाषेत बोलणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही, असे भाजपा जळगाव पूर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर हे म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, राज्य परिषद सदस्या रेखाताई चौधरी, मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, जिल्हा महामंत्री राजेंद्र सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा मनोरमाताई पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल भंगाळे, जिल्हा उपाध्यक्षा कविता चौधरी, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस यशोदाताई पाटील, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस मायाताई सोनवणे, तालुकाध्यक्ष मिलिंद चौधरी, भाऊसाहेब पाटील, तालुका सरचिटणीस निर्दोष पाटील, समाधान धनगर, गौरख कोळी, रवि देशमुख, जिल्हा कार्यालयमंत्री योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




