नशिराबाद-भादली बु. प्रभागात १६ लघुउद्योगांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमधील “उपजीविका विकास व सामाजिक न्याय घडविणे” या घटकाचे औचित्य साधून नशिराबाद – भादली बुद्रुक प्रभागातील १६ लघुउद्योगांचे भव्य उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी राजू लोखंडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव, सरला पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव, हरेश्वर भोई, जिल्हा अभियान व्यवस्थापक, रवींद्र सूर्यवंशी, तालुका अभियान व्यवस्थापक, हेमांगी टोकेकर, प्रभाग समन्वयक, लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विकास धनगर, शहराध्यक्ष, चेतन बराटे, युवा अध्यक्ष, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, प्रतिनीधी, दिनांक 17 ऑक्टोंबर : बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
हा उपक्रम प्रभाग समन्वयक हेमांगी किशोर टोकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमात विविध गावांतील स्वयंसहायता समूहांच्या महिलांचे विविध उद्योग जसे – साडी व लेडीज गारमेंट्स, सेंद्रिय भाजीपाला, टेलरिंग व फॅशन डिझायनिंग, किराणा व डेअरी व्यवसाय, ब्युटी पार्लर, बांगड्या व्यवसाय, चाट व्यवसाय, फरसाण व स्वीट मार्ट, फोटो स्टुडिओ इत्यादींचे व्यवसायांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नशिराबाद–भादली बु प्रभागातील निमगाव बुद्रुक, बेळी, जळगाव खुर्द, भादली बु, कंडारी, रायपूर, नशिराबाद या गावांतील महिलांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ व शोभेच्या वस्तूंचे आकर्षक स्टॉल्सही लावण्यात आले होते. प्रास्ताविक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन हेमांगी टोकेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमिला सपकाळे, अध्यक्ष, आधार महिला प्रभाग संघ यांनी केले.
यशस्वीतेसाठी आधार महिला प्रभाग संघातील सर्व सीआरपी ताई, पशुसखी, कृषीसखी, एफएलसीआरपी व बँकसखी ताई यांनी उत्साहाने परिश्रम घेतले.




