आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयशेतकरीसमस्यासामाजिक

संप कालावधीत महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत

जळगाव (प्रतिनिधी) : वीज कर्मचाऱ्यांच्या २९ पैकी ७ संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवार (दि. ९) पासून सुरू केलेल्या ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. या संपामध्ये महावितरणमधील सुमारे ६२ टक्के अभियंते, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नाहीत.

वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे. तरीही ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाला सुरवात करण्यात आली आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. महावितरणमध्ये गुरुवारी (दि. ९) सुमारे ६२ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यासोबतच २० हजार तांत्रिक बाह्यस्रोत कर्मचारी (यंत्रचालक व विद्युत सहायक) कार्यरत आहेत. संपकाळात प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणात आपात्कालिन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाद्वारे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व साधनसामग्रीने नियोजन करण्यात येत आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येत आहे.

संपकाळातील नियोजनानुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यात संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, २० हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.

संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button