फैजपूर नगरपरिषद : निम्म्याहून अधिक जागा महिलांसाठी राखीव

फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तयारी सुरू झाली असून, याच पार्श्वभूमीवर बुधवार, ८ रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत नगरपरिषद सभागृहात मोठ्या उत्सुकतेत पार पडली. यामध्ये विविध प्रवर्गांमधील आरक्षण निश्चित करण्यात आले असून, महिलांना या वेळेस लक्षणीय प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फैजपूर नगरपरिषद क्षेत्रात १० प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात दोन ते तीन जागा असून, त्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण या प्रवर्गांमध्ये वाटप करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे एकूण जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण असे
- प्रभाग क्रमांक १ – जागा १ अ अनुसूचित जमातीसाठी तर १ ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
- प्रभाग क्रमांक २ – १ अ ना.मा.प्र.साठी, तर २ ब सर्वसाधारण महिलांसाठी
- प्रभाग ३, ४, ५ आणि ८ मध्ये – ना.मा.प्र. (महिला) उमेदवारांसाठी एकेक जागा राखीव असून उर्वरित जागा सर्वसाधारण किंवा सर्वसाधारण महिलांसाठी
- प्रभाग क्रमांक ७ – अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी जागा ७ अ राखीव
- प्रभाग क्रमांक ९ – अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी ९ अ जागा निश्चित
- प्रभाग १० – ३ त्यापैकी १० अ ना.मा.प्र.साठी, १० ब आणि १० क ही दोन्ही सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आहेत.
ही आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडली असून, निवडणूक प्रक्रियेत सर्व नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. स्थानिक पातळीवर महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी दिल्यामुळे आगामी निवडणुकीत महिला प्रतिनिधींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




