मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेरच्या मुलींचा क्रिकेट स्पर्धेत दणदणीत विजय!

रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी रावेर येथील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळीच छाप पाडत दणदणीत विजय संपादन केला आहे. जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची अंडर १७ निवड झाली असून हा क्षण शाळेसाठी अभिमानाचा ठरला आहे. ही स्पर्धा रावेर येथे व्हि.एस. नाईक कॉलेज येथे नुकतीच पार पडली.
या विजयानंतर शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण पसरले.क्रिकेट सारखा पारंपरिकपणे मुलांचा खेळ समजला जाणारा खेळ मुलींनी जिद्दीने आणि कौशल्याने खेळून जिंकणे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. मुलींना खेळाचे सर्व नियम, सराव व तंत्रज्ञान याबाबत वेलनेस टीचर राहुल इंगळे यांनी मार्गदर्शन केले आणि मैदानावरील सरावासाठी शाळेचे बस कंडक्टर महेंद्र पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास व खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
विजयाची ही गोड फळं म्हणजे कठोर परिश्रम, सततचा सराव आणि संघभावना यांचे फलित आहे. “बॉलला सीमा रेषेपलीकडे ढकलण्याची ताकद जशी त्यांच्या बॅट मध्ये होती, तशीच स्वप्नांना गगना पर्यंत नेण्याची जिद्द त्यांच्या मनात होती.” या ऐतिहासिक विजयाबद्दल विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर, शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग व पालक वर्ग या सर्वांनी एकमुखाने केले आहे.
शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा दिल्या. हा विजय फक्त क्रिकेटचा नाही तर मुलींच्या आत्मविश्वासाचा, त्यांच्या धैर्याचा आणि नव्या इतिहासाची सुरुवात करणारा ठरला आहे.




