‘एक पेड माँ के नाम” अभियानात चोरवड आघाडीवर; 2 हजार झाडांचे वृक्षारोपण

_
ना. रक्षा खडसे व संजय सावकारे यांच्या उपस्थितीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, (प्रतिनिधी )- केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या वृक्षारोपण अभियानांतर्गत चोरवड ( ता. भुसावळ) येथे महावृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमात 2 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, “हे अभियान युवकांच्या सक्रिय सहभागातून राष्ट्रीय चळवळ बनू शकते. युवकांनी केवळ वृक्षलागवड न करता वृक्षांचे संगोपनही मनावर घ्यावे.” त्यांनी “माय भारत पोर्टल”ची माहिती देत युवकांना त्यावर नोंदणी करून वृक्षारोपणाचे फोटो अपलोड करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बियाणी शिक्षण संस्थेच्या सचिव संगीता बियाणी, रासेयोचे विभागीय संचालक सचिन नांद्रे, जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, भूषण पाटील (नंदुरबार) आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री संजय सावकारे यांनीही युवकांना पर्यावरण रक्षणात भाग घेण्याचे आवाहन करत स्वतः वृक्षारोपण केले. माय भारत व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मिळून 2 हजार झाडे लावली, तर सुमारे 2हजार 500 युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या उपक्रमात बियाणी मिलिट्री स्कूल भुसावळ, पी. ओ. नाहटा ज्युनिअर व सीनिअर कॉलेज भुसावळ, पी. के. कोटेचा महिला ज्युनिअर व सीनिअर कॉलेज भुसावळ, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय साकेगाव (भुसावळ), डी. डी. एन. भोळे कॉलेज भुसावळ, गोदावरी नर्सिंग कॉलेज भुसावळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुर्हे पानाचे या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सर्व सहभागी युवकांना “माय भारत” तर्फे टी-शर्ट व टोपी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी सचिन पांझडे, लेखा व कार्यक्रम सहाय्यक सुनील पंजे, तुषार साळवे, चोरवड सरपंच भैय्या महाजन, पंचायत समिती भुसावळ व ग्रामपंचायत चोरवडचे कर्मचारी व सदस्य, माय भारत, एनएसएस व युवक मंडळाचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले