चोपडा नगरपरिषदेच्या “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” मंडळाचा जिल्ह्यात पहिला क्रमांक

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ निकाल जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या निर्णयानुसार गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत यावर्षी आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील जिल्हास्तरीय निकालात “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” चोपडा नगरपरिषद, चोपडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्यभरातून १३९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड गठीत समित्यांनी केली असून, राज्यस्तरीय प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा (ता. खानापूर) यांना मिळाला आहे. द्वितीय क्रमांक लातूर जिल्ह्यातील वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव, राजीव गांधी चौक, लातूर यांना तर तृतीय क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील सुवर्णयुग तरुण मंडळ, पाथर्डी (ता. पाथर्डी) यांना प्राप्त झाला आहे.
जिल्हास्तरीय निकाल
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जिल्हास्तरीय निकालात “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” चोपडा नगरपरिषद, चोपडा मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच द्वितीय क्रमांक श्री वज्रेश्वरी देवी गणेश मंडळ, जळगाव व शिवमुद्रा प्रतिष्ठान, भुसावळ यांना मिळाला आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत रावेर श्री गजानन युवा मित्र मंडळ, या मंडळाचा समावेश आहे.
या स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम विजेत्या मंडळास ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय विजेत्यास ५ लाख रुपये, तर तृतीय विजेत्यास २ लाख ५० हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये, तर तालुकास्तरीय विजेत्या प्रत्येक मंडळास २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येईल.
राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून, यातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरणपूरकता व संस्कृती संवर्धनाला चालना मिळणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मधील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या मंडळांच्या पारितोषिक वितरणाचा भव्य कार्यक्रम २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार आहे. तर. जिल्हास्तरीय द्वितीय, तृतीय व सर्व तालुकास्तरीय विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.




