जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक मदत व बचाव कार्यासाठी दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : काल रात्री व आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अजिंठा पर्वतरांगातून नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव व एरंडोल तालुक्यातील काही गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सखल भागातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापनाद्वारे रेस्क्यू बोट्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) पथक मदत व बचाव कार्यासाठी दाखल झाले आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी सुरक्षित स्थळीच थांबावे, अनावश्यकपणे नदीकाठी / पाण्याजवळ जाऊ नये, कोणत्याही अडचणीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी नियंत्रण कक्ष दूरध्वनी : 0257-2217193 आणि टोल-फ्री क्रमांक : 1077 येथे संपर्क साधावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बहुळा धरणाचे ९ दरवाजे उघडले
बहुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुळा धरणाचे ९ दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठी जाऊ नये. जनावरे, साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.




