बंजारा समाजाचा २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हास्तरीय बैठकीत निर्धार
जळगाव (प्रतिनिधी) : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रविवार, १४ सप्टेंबर रोजी सकल बंजारा समाजाच्या वतीने जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. येत्या २६ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्ध्याच्या नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुका व प्रत्येक तांड्यांतून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
समाजाच्या हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन या वेळी उपस्थित नेत्यांनी केले. “हा मोर्चा जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या एकतेचे आणि ताकदीचे प्रतीक ठरेल,” असा विश्वास आरक्षण कृती समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. आरक्षणाच्या लढ्यात समाज एकत्र येत असून, हा लढा लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
यावेळी रविंद्र पवार, मेहताबसिंग नाईक, सुभाष जाधव, रमेश नाईक, राजेश नाईक, सुधाकर राठोड, मोरसिंग राठोड, कांतीलाल नाईक, चरणसिंग राठोड, मोरसिंग राठोड, निलेश चव्हाण, डॉ. तुषार राठोड, अरुण पवार, आत्माराम जाधव,देविदास चव्हाण, काशिनाथ चव्हाण, भाऊलाल जाधव, विजय पवार, रमेश नाईक यांच्यासह समाजातील बहुतांश प्राध्यापक, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील तसेच मोलमजुरी करणाऱ्यांपासून सर्वच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




