महापुराआपतग्रस्थांसाठी जळगाव रेडक्रॉसकडून एक ट्रक साहित्य रवाना

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आवाहनास प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगावचे पदसिद्ध अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, महापुरामुळे उध्वस्त झालेल्या अमृतसरमधील 200 परिवारांसाठी मदत साहित्याने भरलेला एक ट्रक रवाना करण्यात आला.
रेडक्रॉस कार्यालयातून रात्री हा ट्रक मार्गस्थ झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झेंडा दाखवून मदतसामग्रीची रवानगी करण्यात आली. यावेळी देणगीदाते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रकमध्ये दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य
या ट्रकमध्ये दैनंदिन जीवनोपयोगी साहित्य – किराणा सामान, तांदूळ-डाळी, तेल, सोलापुरी चादरी, उबदार कपडे, तंबू, ताडपत्री, भांडी, बादल्या, ब्लॅंकेट, ड्राय फ्रुट, फूड पॅकेट्स, हल्दीराम नमकीन, लोणचे, खाकरा, चिक्की, साबण, टूथब्रश-पेस्ट, मच्छरदाणी, औषधे, सोलर दिवे, टॉर्च आदी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.
देणगीदारांकडून आर्थिक मदत
देणगीदारांनी साहित्य थेट स्वरूपात तसेच आर्थिक मदत करून मोठ्या उदारतेने सहभाग नोंदविला. जळगाव पीपल्स बँकेने ट्रक भाड्याची ७८ हजार रुपयांची रक्कम अदा करून विशेष सहकार्य केले. या उपक्रमासाठी उपाध्यक्ष गनी मेमन, भालचंद्र पाटील, चेअरपर्सन डॉ. मंगला ठोंबरे, सेक्रेटरी सुभाष सांखला, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, व्हाईस चेअरमन राजकुमार वाणी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. साहित्याची पाहणी केंद्र मंत्री मा. रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. रेडक्रॉस पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
देणगीदारांमध्ये जैन इरीगेशन, व्यंकटेश रिफायनरी, अनिल कांकरीया, श्रद्धा पॉलिमर्स, सांखला अर्बन सोसायटी, रोहन बाहेती, सुहास लढ्ढा, श्यामसुंदर बिर्ला, संघवी अनब्रेकेबल, ओमप्रकाश राठी, सुनील सुखवानी, विनोद बियाणी यांच्यासह अनेक संस्था व व्यक्तींचा समावेश आहे. रेडक्रॉसचे लोकाभिमुख सेवाकार्य ‘सेवा, स्नेह व समर्पण’ या सूत्रावर आधारित असून, जनसहभागामुळेच हे कार्य यशस्वीपणे पार पडते, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




