जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा

वार्षिक योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा होऊन घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार, खासदार व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ व २०२५-२६ या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच या चर्चेत ग्रामीण व शहरी विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग व रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रांवरील योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जळगाव जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.




