
धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून धामोडी येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी करण्यात आली. खोकल्याचा त्रास जाणवणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या गोळ्या व औषधांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य विषयक प्राथमिक मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शाळेत अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये खोकल्याचे प्रमाण वाढले असल्याची बाब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित याकडे गांभीर्याने पाहून धामोडी उपकेंद्र येथील डॉ. रमेश इंगळे यांच्याशी संपर्क साधला. सूचना मिळताच डॉ. इंगळे यांनी शाळेत येऊन सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दुर्गादास पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, संजय सोनवणे, जगदीश पाटील, बाळू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची विचारपूस केली व शालेय स्तरावर अशा आरोग्य तपासणी उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा आरोग्य उपक्रम राबविण्यात आल्याने पालकवर्ग व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे ही खरी सामाजिक जबाबदारी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी नोंदवले.




