ऐतिहासिकजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीय

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल

इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) : शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची जागतिकस्तरावर नोंद घेत इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने महावितरणचा सन्मान करण्यात आला. या अभियानाचे मार्गदर्शक आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनाही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी स्वीकारले. यावेळी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल (लंडन), प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन (अमेरिका), ज्येष्ठ संपादक व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराच्या निवड समितीकडून महावितरणच्या विद्युत सुरक्षेच्या लोकाभिमुख अभियानाचे कौतुक करण्यात आले. यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष हेनरी आर (युरोप), प्रमुख पाब्लो (इंग्लंड), उपाध्यक्ष संजय पंजवानी, परीक्षक चंद्रशेखर शिंदे यांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानातील विक्रमी लोकसहभागाची दखल जागतिकस्तरावर घेण्यात आल्याबाबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे छोटेखानी बैठकीत कौतुक केले. शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट हे महावितरणच्या कामाचा दैनंदिन भाग आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांद्वारे सातत्याने लोकसंवाद साधून विद्युत सुरक्षेची माहिती देत राहावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांची उपस्थिती होती.

विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ ही इंग्लंडमधील जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेने महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानातील लोकसहभाग आंतरराष्ट्रीय विक्रम असल्याची घोषणा केली व मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला. यावेळी युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नेपाळ आणि भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम
महावितरणने यंदा २० व्या वर्धापन दिनानिमित्त १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे तर ३५ लाख ७३ हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत इमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या अभियानातील लोकसहभागाच्या पाच विक्रमांसाठी महावितरणला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी नुकतेच गौरविले आहे. आता या अभियानाच्या लोकसहभागावर आंतरराष्ट्रीय विक्रमाचा शिक्कामोर्तब झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button