
जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये गणेश चतुर्थी सारख्या सणांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वच्छता म्हणजे रोजचा सण …नाहीतर कायमचे आजारपण ; असा पर्यावरणपुरक गणेशोत्सवातुन लाखमोलाचा सामाजीक संदेश देण्यात आला. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
पहिल्या दिवसाची मानाची आरती शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, तसेच माता-पालक संघटनेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आली. वृक्षारोपण, शौचालये आणि कचराकुंड्यांचा योग्य वापर आणि कापडी पिशव्यांचा वापर यांना प्रोत्साहन देण्यासाठी घोषवाक्य लिहिण्यात आलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना घरामधील गणपतीचे निर्माल्य रोज शाळेत जमा करण्यासाठी शाळेमध्ये मोठी डस्टबिन ठेवण्यात आलेली आहे.
विसर्जनानंतर निर्मल्या पासून सेंद्रिय खत तयार करून शाळेतील परसबाग मध्ये वापरण्यात येणार आहे अशी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण करून गणरायांच्या आगमनाचा जल्लोष केला.




