जळगाव जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन

तीन हजाराहून अधिक गणपती होणार स्थापन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आज, बुधवारी, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे जल्लोषात आगमन झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात भाविक गणरायाचे स्वागत करत आहेत, तर अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. जिल्ह्यात ६९७ खाजगी, २ हजार ८९ सार्वजनिक तर एक गाव एक गणपती १६० असे श्री गणेश स्थापन होणार आहेत.
पोलीस दलाची जय्यत तयारी
या उत्सवादरम्यान होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी बाहेरच्या जिल्ह्यांमधून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. यात ३ पोलीस उपअधीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी आणि १८०० होमगार्ड्स (महिला व पुरुष) यांचा समावेश आहे.
विशेष गस्त पथके तयार
शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रमुख गणेश मंडळे, मिरवणुका, विसर्जन घाट आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत विशेष गस्त पथके तयार करण्यात आली आहेत, जी प्रभावीपणे गस्त घालतील.
संशयास्पद प्रकार आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
दंगल नियंत्रण योजना आणि रूट मार्चचेही आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना शांतता, सलोखा आणि कायद्याचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद घटना किंवा प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.




