गावो – गावी योजनांचा लाभ, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत

पंचायत समिती तक्रार निवारण आढावा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगाव (प्रतिनिधी) : गरिबाला हक्काचं घर वेळेवर मिळव ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. अधिकारी वर्गाने थेट मदत करून त्यांचे घर पूर्ण करावे.” तसेच, जल जीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण व्हावीत यावर त्यांनी विशेष भर देवून अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्रित समन्वयाने काम केले तरच योजना लोकांपर्यंत वेळेत पोहोचतील. उशीर झाला तर तक्रारी येतात. प्रत्येक योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय का, हे काटेकोरपणे तपासा. निकृष्ट दर्जा आणि विलंब म्हणजे तक्रारींचं कारण. कामं उच्च दर्जाची करा, वेळेत पूर्ण करा. आलेल्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करा आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम करून त्यांचे आशीर्वाद मिळवा. हेच प्रशासनाचे खरे यश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथे पंचायत समिती तक्रार निवारण आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या खास रोखठोक शैलीत निर्देश देतांना सांगितले की, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, शाळा खोल्या, अंगणवाड्या व पोहोच रस्ते – ही लोकांच्या दैनंदिन गरजा आहेत. यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी वेळेत सादर करून शेत पाणंद रस्ते आणि गोठ्यांचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, आवश्यक त्या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण शेत रस्त्यांना VR दर्जा देण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. “जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढली पाहिजे. शिक्षकांनी पालक भेटी घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी. शाळाबाह्य एकही विद्यार्थी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेबाबत जबाबदारीने लक्ष द्यावे, असेही त्यांनी बजावले.
पाचवी-आठवी शिष्यवृत्ती गुणवंतांचा सत्कार
जळगाव तालुक्यात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोलणार येथील ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण झाल्याने पूर्णत्वाचा दाखला सरपंच व ग्रामसेवक यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
८-१० दिवसात तक्रारींचा निपटारा करून ग्रामपंचायतीने घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी – मु.का.अ. मिनल करनवाल
जिल्हा प्रशासन गतिमान होऊन शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जळगाव तालुक्याची तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आलेल्या तक्रारींची नोंद करून पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार तात्काळ सोडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. तसेच आठ ते दहा दिवसांत सर्व तक्रारींचा निपटारा केला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले.
या बैठकीत घरकुल बांधकाम, गोठे बांधकाम, अतिक्रमण, शिक्षण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत विभाग अंतर्गत सुरू असलेली कामे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रभारी गटविकास अधिकारी सरला पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, डी. आर. डी. ए. प्रकल्प संचालक राजू लोखंडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गटविकास अधिकारी सरला पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, माजी महापौर तथा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी जि. प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्दन आप्पा कोळी, हर्षल चौधरी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश आप्पा पाटील, रवी कापडणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी – कर्मचारी तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




