कलाकारजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीयशैक्षणिकसामाजिकसाहित्यिक

लेखकांसाठी सुवर्णसंधी; अकादमीचे बाल व युवा साहित्य पुरस्कारासाठी पुस्तक नोंदणीला सुरुवात

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : भारतातील प्रतिभावंत लेखकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार २०२६ आणि युवा साहित्य पुरस्कार २०२६ साठी पुस्तकांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील २४ मान्यताप्राप्त भारतीय भाषांतील लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींना या पुरस्कारांसाठी आपली पात्र पुस्तके पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाल साहित्य पुरस्कारासाठी पात्रता:
साहित्य अकादमीकडून २०१० पासून प्रत्येक वर्षी उत्कृष्ट बाल साहित्यासाठी पुरस्कार दिला जातो. यामध्ये मराठीसह आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी पाठवली जाणारी पुस्तके विशेषतः ९ ते १६ वयोगटातील मुलांना उद्देशून लिहिलेली असावीत. त्याचबरोबर ही पुस्तके १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रथमच प्रकाशित झालेली असावीत.

युवा साहित्य पुरस्कारासाठी पात्रता:
२०११ पासून सुरु झालेल्या युवा साहित्य पुरस्काराचा उद्देश ३५ वर्षांखालील तरुण लेखकांना साहित्य क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा आहे. अर्जदार लेखकाचे वय 1 जानेवारी २०२५ रोजी ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रतींसह लेखकाचा जन्मतारखेचा पुरावा (स्व-प्रमाणित आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र) पाठवणे बंधनकारक आहे. दोन्ही पुरस्कारांसाठी 31 ऑगस्ट 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. साहित्य अकादेमीच्या बाल व युवा साहित्य पुरस्कारांतर्गत ५०,०००/- रुपयांची रोख रक्कम, ताम्रपट आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.

या पुरस्कारासंदर्भातील संपूर्ण माहिती व नियमावली साहित्य अकादेमीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sahityaakademi.gov.in उपलब्ध आहे. लेखक, प्रकाशक व साहित्य क्षेत्रातील नवोदितांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन साहित्य अकादेमीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button