
कर वसुलीसाठी क्यूआर कोड प्रणालीची अंमलबजावणी
जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील गांधली ग्रामपंचायतीने डिजिटल परिवर्तनाची कास धरत एक अभिनव पाऊल उचलले आहे. पारंपरिक घर क्रमांकाऐवजी प्रत्येक घरावर क्यूआर कोड लावून कर वसुली करण्याची आधुनिक पद्धत ग्रामपंचायतीने राबवली आहे. ही प्रणाली राबवणारी धुळे, जळगाव व नंदुरबार या तीनही जिल्ह्यांतील पहिली ग्रामपंचायत म्हणून गांधलीने उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आहे.
या क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी ऑनलाइन भरता येणार असून, मालमत्तेची माहिती, चालू/थकीत कर रक्कम, पावती डाऊनलोड व डिजिटल पेमेंटसारख्या सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक, सुसूत्र व विश्वासार्ह होणार आहे.
हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक प्रमोद पाटील, संगणक सहायक मंगेश मांडे आणि ग्रामपंचायत कार्यकारणीच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात आला. या उपक्रमास गांधली ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा लाभल्याचे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. गांधली ग्रामपंचायतीचा हा ‘हायटेक’ उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




