वीर जवानांसाठी जळगावच्या भगिनींनी शुभेच्छा पत्रांसह पाठविल्या राख्या

रक्षाबंधनानिमित्त विचार वारसा फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : देशाच्या सीमेवर अहोरात्र सज्ज राहून कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांना सलाम करण्याचा आणि रक्षाबंधनाचा सण खास पद्धतीने साजरा करण्याचा एक अनोखा उपक्रम जळगावच्या विचार वारसा फाउंडेशनतर्फे यंदाही राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांतील महिला भगिनींनी सैनिकांसाठी प्रेमाने बनवलेल्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या.
रक्षाबंधनाचा सण हा बंधुत्व, प्रेम आणि सुरक्षा यांचे प्रतीक मानला जातो. हीच भावना मनात ठेवत विचार वारसा फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांसाठी राखी पाठवण्याची परंपरा जपली आहे. मेहरूण परिसरातील सप्तशृंगी नगर, एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, महाजन नगर, नागसेन नगर, एमडीएस कॉलनी या भागांतील महिला नागरिकांनी आपल्या हाताने तयार केलेल्या आणि शुभेच्छा पत्रांसह सजवलेल्या या राख्या संस्थेकडे सुपूर्द केल्या. त्यानंतर या राख्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे औपचारिकरित्या देण्यात आल्या, जे पुढे त्या देशाच्या विविध सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचवतील.
या उपक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, अभिजित राजपूत, आकाश तोमर, अक्षय गवई, गौरव डांगे, सोपान पाटील, रामेश्वर लोहार यांच्यासह विचार वारसा फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राख्यांमागे केवळ धार्मिक भावना नसून, देशसेवेबद्दल कृतज्ञता, आदर आणि सैनिकांप्रती असलेले भावनिक नाते देखील दडलेले आहे, असे मत यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.