
एक उपयुक्त उपक्रम – पंडित कोल्हे
फैजपूर (प्रतिनिधी) : येथील स्व. विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना वह्या, दप्तरे यासारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा अत्यंत उपयुक्त असा विद्यार्थ्यांच्या हिताचा उपक्रम असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष पंडित कोल्हे यांनी सांगितले.
बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विपुल विलास बोरोले प्राथमिक शाळेत संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. विलास बोरोले यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव स्व. विपुल बोरोले यांच्या स्मृतीनिमित्त शाळेतील इयत्ता पहिलीच्या र्व विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तर व २ री ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते चिरंजीव विपुल बोरोले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिरा, पोहे अल्पोपहार देण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. उमेश चौधरी, पदाधिकारी मोहन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चिरंजीव विपुलचे नातेवाईक रितेश सरोदे व भाग्यश्री सरोदे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. एम. बोंडे, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता पाटील यांनी केले. सूत्रसंचलन जयश्री पाटील यांनी तर आभार समाधान ताजने यांनी मानले.