
विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीघेतला परीक्षेत भाग
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शनिवार, २ ऑगस्ट रोजी श्रीमद्भगवद्गीता या अध्यात्मिक ग्रंथावर राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. दरवर्षा प्रमाणे यंदाही प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे तसेच किर्ती निळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आध्यात्मिक वारसा पुढे चालण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
हा ग्रंथ ‘महाभारत’ या महाकाव्याचा भाग असून त्यात १८ अध्याय (७०० श्लोक) आहेत. भगवतगीतेत, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर (कुरुक्षेत्र) मार्गदर्शन केले आहे, असे सांगितले जाते. भगवतगीतेत, जीवनाचे तत्त्वज्ञान, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे महत्त्व सांगितले जात असून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करावे म्हणून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
१५० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
या स्पर्धेत तिसरी ते दहावीच्या तब्बल १५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच वर्षा पवार, मिनाक्षी चौधरी, गायत्री गोसावी, अर्चना पवार, नूतन धनगर, ममता महाजन, प्रियंका महाजन, ज्योती महाजन, सविता भुसे, अश्विन महाजन या शिक्षकांनी सुद्धा परीक्षेत भाग घेतला. सुपरव्हिजन समीर तडवी यांनी केले.यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.