जळगावयोजनाशासकीयशैक्षणिक

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ जळगाव जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना वेळेवर मिळावा यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल यांच्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

महाडीबीटी (MahaDBT) या ऑनलाइन पोर्टलद्वारे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० जून २०२५ पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित महाविद्यालयांनी तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील अनुक्रमे १४७ व ५३९ शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून, हे सर्व अर्ज २५ जुलै २०२५ पूर्वी शासननिर्णयाच्या अधीन राहून निकाली काढावेत, असे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय, मागील शैक्षणिक वर्षांमध्ये अर्ज न करता राहिलेल्या विद्यार्थ्यांनी देखील ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. अन्यथा शिष्यवृत्तीच्या वाटपात अडचणी येऊ शकतात.

प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या स्तरावरून व्यापक जनजागृती करावी. सोशल मीडिया, सूचना फलक, बैठका व इतर माध्यमातून प्रचार करून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत व त्यांना योजनांचा वेळेवर लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button