
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सुदृढ व कर्मचारी उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची आधार बेस बायोमेट्रिक हजेरी प्रणाली 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमितपणे केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक प्रणालीसाठी कर्मचाऱ्यांचा आधार डेटा अद्ययावत करून फेस रीडिंगद्वारे बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्याची व्यवस्था पूर्णत: कार्यान्वित करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया केवळ आरोग्य विभागापुरती मर्यादित न राहता, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचीही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरु करण्यात आली आहे. लवकरच ग्रामसेवक व प्राथमिक शिक्षक वर्गासाठीही आधार बेस बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा आढावा दर शुक्रवारी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल घेणार असून, यामुळे जिल्ह्यातील सरकारी सेवा कार्यक्षमतेने आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे