
रावेर (प्रतिनिधी) : स्वराज्याचा ध्यास घेतलेल्या आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथे श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सुनील पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित माहितीपट सादर केले. दिपक माळी यांनी टिळकांचे देशप्रेम, शिक्षणाविषयीची तळमळ आणि समाजप्रबोधनाचे कार्य यावर प्रकाश टाकला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय करून दिला.
कार्यक्रमात अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टिळकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशसेवेची भावना बाळगण्याचे आवाहन केले. दुसरीच्या संयुक्ता विद्यार्थिनीने लोकमान्य टिळक यांच्या बालपणावर भाषण दिले. शेवटी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत सादर करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून टाकले.