
ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदीर येथे शुक्रवार १ ऑगस्ट रोजी शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथि व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक एन.व्ही.पाटील हे होते.
सुरुवातीला शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन, मुख्याध्यापक अक्षय पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अनुक्रमे ३१ व २० विद्यार्थ्यानी मनोगते व्यक्त केली. तसेच अध्यक्षीय भाषणातून एन.व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्याना लोकमान्य टिळकाविषयी माहिती दिली. नेहमी खरे बोलावे तसेच माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरीही शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची,राज्याची व गावाची प्रगती होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची मनोगते ऐकून त्यांच्या पालक आणि शिक्षिकांचे कौतुक केले. याप्रसंगी कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियुष नेहते, पुष्पराज शेळके, कुणाल सपकाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा बारी यांनी केले. आभार वैष्णवी महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.