
ऐनपूर ता.रावेर (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ऐनपूर येथे बोर्डो पेस्ट या प्रक्रियेवर प्रात्यक्षिकात्मक कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट पिकांसाठी कशी फायदेशीर आहे. तसेच ती बनवण्यासाठी लागणारी सामग्री आणि प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बोर्डो पेस्टची प्रक्रिया केल्यामुळे पिकांवरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. लिंबूवर्गीय पिकांवरील डिंका रोग, डाळिंबावरील तेल्या यांसारख्या रोगांवर हे प्रभावी नियंत्रण देते. यामुळे उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय खर्चातही बचत होते आणि पर्यावरणालाही कोणतीही हानी पोहोचत नाही. या कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवली व समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रात्यक्षिकात कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियूष नेहते, पुष्पराज शेळके आणि कुणाल सपकाळे यांनी विशेष मेहनत घेतली.