मॅक्रो व्हिजनचा वेदांतची जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी!

पुणे/रावेर (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत रावेर येथील मॅक्रो व्हिजनचा विद्यार्थी वेदांत पाटील (इयत्ता नववी) याने आपली चमकदार कामगिरी सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.
अंडर-१७ गटात झालेल्या या स्पर्धेत वेदांतने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ‘सर्वोत्कृष्ट’ हा मानाचा किताब मिळवला आहे. वेदांत हा सरदार जी.जी. हायस्कूल, रावेर येथे कार्यरत असलेले विनोद पाटील यांचा चिरंजीव असून त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण आहे.
सर्वत्र होत आहे अभिनंदन
“क्रीडांगणावर आपले कौशल्य दाखवून मिळवलेले यश हेच खरे सोनं असतं” , अशा शब्दात शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनके यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच त्याचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे शाळेमध्ये आनंदाचे वातावरण असून शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या.
मॅक्रो व्हिजनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेद्वारे पुन्हा एकदा शाळेचा गौरव वाढवला आहे. मॅक्रो व्हिजन परिवाराने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून भविष्यातही तो असाच उत्तुंग यश संपादन करेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.




