
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर येथे २३ जुलै ते २६ जुलैदरम्यान ‘एक पेड़ मां के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून संगोपनाची जबाबदारी घेतली.
तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात झाड लावून त्याचे फोटो शिक्षकांना पाठविले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण केले. पर्यावरण संरक्षणात विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा असावा यासाठी मुख्याध्यापिका यांच्या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.