निंभोरा येथील दिशा बोरणारे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी रवाना

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील मुळ निवासी व सद्या मुंबईत कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरणारे यांची कन्या दिशा बोरणारे हिची अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून नुकतीच ती अमेरिकेला रवाना झाली आहे. दिशा ही प्राचार्य अनिल बोरणारे यांची कन्या आहे. बोरणारे कुटुंबाचे मूळ गाव निंभोरा बुद्रुक असले तरी सध्या ते मुंबईत वास्तव्यास आहे.
दिशा बोरणारे हिने अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नामांकित नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला असून ती डेटा सायन्स या विषयात उच्च पदवी घेणार आहे. आजच्या डिजिटल युगात डेटा सायन्स क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा महत्त्वाच्या क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी दिशा परदेशात जात असल्यामुळे तिच्या यशाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
दिशाने आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीत उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या जिद्द, मेहनत आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळेच तिला हे यश मिळाल्याचे ती सांगते. अमेरिकेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने दिशा अत्यंत उत्साही आहे.
निंभोरा बुद्रुक या लहानशा गावातून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाची संधी मिळाल्याने बोरणारे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. गावकऱ्यांसह नातेवाईक, मित्रपरिवार व शुभेच्छुक यांनी दिशाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




