
मातीतील किरणोत्सारी पदार्थांचे विश्लेषण करण्यासाठी होणार उपयोग
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत डॉ. विशाल भारूड यांना “ऍग्रीकल्चर सॉईल अनालिसिस अँड इवोल्युशन थ्रू गामा रे ऑटोनेशन” या संशोधन प्रकल्पासाठी सेंटिलेशन डिटेक्टर (सोडियम आयोडाइड डोपड विथ थॅलियम) मंजूर झाले आहे. रेडिओऍक्टिव डिटेक्टर हे मु जे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात १७ जुलै रोजी स्थापित करण्यात आलेले आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय भारंबे, के.सी.इ सोसायटीच्या पी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर महाजन, इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ कविता पाटील, संशोधक प्राध्यापक डॉ. विशाल भारूड, विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शेतातील मातीत असणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे विश्लेषण करण्यासाठी हे डिटेक्टरचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच मातीची जलधारण क्षमता आणि भुसभुशीतपणावर किरणोत्सारी पदार्थांचे होणारे परिणाम हा या डिटेक्टरच्या माध्यमातून तपासता येणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील हे पहिलेच डिटेक्टर असून त्याचा लाभ संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक घेऊ शकतात.
या प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय ढोले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. जयदीप साळी , के.सी.इ. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय भारंबे, के.सी.इ सोसायटीच्या पी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर महाजन, डॉ. पद्माकर चव्हाण आणि डॉ. प्रेमजीत जाधव यांचे सहकार्य लाभले.