
जळगाव (प्रतिनिधी) : रविवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री पासून ते ८ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत खग्रास चंद्रग्रहण हि अदभूत खगोलीय घटना बघायला मिळणार आहे. ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी चंद्र आधी पृथ्वीच्या विरळ सावलीला (Penumbral) स्पर्श करेल आणि ग्रहणाला सुरुवात होईल. त्यानंतर ९ वाजून ५७ मिनिटांनी पृथ्वीच्या गडद सावलीला (Umbra) स्पर्श करेल आणि खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल.
रात्री ११ वाजता चंद्र पुर्ण गडद सावलीत (Umbra) गेलेला असेल. रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीच्या मध्यभागी असेल. ८ सप्टेंबरच्या सकाळी १२ वाजून २३ मिनिटांनी चंद्र गडद सावलीतून (Umbra) विरळ सावलीत (Penumbral) प्रवेश करेल. १ वाजून २६ मिनिटांनी चंद्र पुर्ण विरळ सावलीत (Penumbral) असेल. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी चंद्रग्रहण संपेल. रविवार ७ सप्टेंबरला रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी सुरु झालीले चंद्रग्रहण ८ सप्टेंबरच्या सकाळी २ वाजून २५ मिनिटांपर्यंत चालेल. म्हणजे एकून ५ तास २७ मिनिटे इतका काळ लागेल. जवळ जवळ १ तास २३ मिनिटे चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत असेल.
चंद्रग्रहण कसे होते ?
अवकाशात पृथ्वीच्या दोन सावल्या पडतात गडद सावली (Umbra) आणि विरळ सावली (Penumbra). चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा (आयनिक वृत्त) यांच्यात ५ अंशाचा कोन आहे. चंद्राची कक्षा आयनिक वृत्ताला दोन ठिकाणी छेदते त्यांना राहू आणि केतू (Asending Node & Desending Node) असे म्हणतात. चंद्राच्या कक्षेत आणि आयनिक वृत्त याच्यात असलेल्या कोनामुळे प्रत्येक पौर्णिमेला चंद्र या बिंदूंवर असतोच असे नाही कारण हे दोन्ही बिंदू सुद्धा फिरत असतात. ज्यादिवशी पृथ्वी आणि सुर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर राहू किंवा केतू हे बिंदू असतांना तेथे चंद्र आला तर तो पृथ्वीच्या दाट सावलीत (Umbra) सापडतो आणि खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळते. ज्यावेळी तो या बिंदूंच्या फार वर किंवा फार खाली असतील तर त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीतून (Penumbra) जातो या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण (Penumbral Eclipse) म्हणतात. ज्यावेळी तो या बिंदूंच्या थोडा वर किंवा खाली असतो त्यावेळी चंद्राचा काही भागच दाट (Umbra) सावलीतुन जातो यावेळी होणाऱ्या ग्रहणाला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.
आवाहन
सध्या पावसाळा असल्याने पाउस किंवा ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. वातावरण साफ असेल तर सर्वांनी कोणतेही समज-गैरसमज मनात न ठेवता चंद्रग्रहण या अदभूत खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.




