‘इकॅमेक्स-२०२६’ प्रदर्शनात महावितरणकडून विद्युत सुरक्षेचा संदेश; केंद्रीय राज्यमंत्री यांचे कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात महावितरणने उभारलेल्या दालनाला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री Shripad Naik यांनी भेट देत विविध योजनांची माहिती घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रदर्शनाचे उद्घाटनही श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्युत कंत्राटदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऊर्जा क्षेत्राच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी ऊर्जा क्षेत्रातील राज्याच्या प्रगतीविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी तयार केलेल्या ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’मुळे शाश्वत व परवडणाऱ्या विजेच्या उपलब्धतेला चालना मिळत असल्याचे सांगितले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा परिवर्तन प्रक्रियेला वेग मिळाला आहे. सौर ऊर्जा योजनांमुळे लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला असून, ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत मोठ्या संख्येने घरगुती ग्राहकांना लाभ मिळत आहे, अशी माहितीही देण्यात आली.
प्रदर्शनादरम्यान महावितरणच्या दालनाला भेट देऊन श्रीपाद नाईक यांनी विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी त्यांचे स्वागत राजेंद्र पवार यांनी केले. तसेच विशेष कार्य अधिकारी सुधन्वा पत्की, इकॅमचे अध्यक्ष देवांग ठाकूर आणि सरचिटणीस अमरनाथ पाटील उपस्थित होते.
या तीन दिवसीय प्रदर्शनात महावितरणकडून विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार आणि डॉ. संतोष पाटणी यांनी विशेष सत्रात नागरिकांना सुरक्षित वीज वापराबाबत मार्गदर्शन केले.
महावितरणच्या प्रदर्शनात अधीक्षक अभियंता संजय खंडारे , मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, तसेच इतर अभियंते व अधिकारी यांनी विविध योजना आणि विद्युत सुरक्षेविषयी नागरिकांना माहिती दिली.




