आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान १ एप्रिलपासून सुरू

राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात १ एप्रिलपासून होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबितकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम गती घेणार आहे.

हे अभियान केवळ सरकारी उपक्रम न राहता लोकसहभागातून व्यापक आरोग्य चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व स्वच्छ करण्यावर भर दिला जाणार आहे. गावपातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांची यंत्रणा मजबूत करण्यास या योजनेचा मोठा हातभार लागेल.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर अधिक भर देणे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे, सकारात्मक सवयी विकसित करणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यामध्ये स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच पोषण या मूलभूत घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचाही समावेश या अभियानात करण्यात आला आहे.

या मोहिमेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांसह सर्व आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती करून ‘आरोग्यदायी गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button