ताज्या बातम्याजळगावपुरस्कार

महावितरणच्या अध्यक्षांना राष्ट्रीय नेतृत्व पुरस्काराने सन्मान

जळगाव (प्रतिनिधी): ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना ‘इंडियाज बिझनेस लिडर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड–२०२६’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत जाहीर करण्यात आला.

मुंबई येथील स्टॉक एक्सचेंजच्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन हॉलमध्ये टाइम्स एस्पायर या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय नेतृत्व शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत संस्थात्मक नेतृत्व, पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जा, तंत्रज्ञानाधारित उपक्रम, कौशल्यविकास आणि नवोपक्रम यांसारख्या विषयांवर देशभरातील विविध सरकारी व खासगी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार मांडले. जाहीर झालेला पुरस्कार श्री. लोकेश चंद्र यांच्या वतीने महावितरणचे वरिष्ठ अधिकारी श्री. सचिन तालेवार व श्री. मंगेश कोहाट यांनी स्वीकारला.

राज्यात ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेल्या परिवर्तनात महावितरणने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दीर्घकालीन वीज खरेदी करारांद्वारे विविध ऊर्जा स्रोतांमधून मोठ्या क्षमतेची वीज उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, वीज खरेदीवरील खर्च कमी करणे तसेच औद्योगिक व व्यावसायिक दर सुलभ करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या सौर योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याशिवाय, विजेच्या मागणीचा अचूक अंदाज घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याद्वारे कमी खर्चात वीज व्यवस्थापन शक्य झाले आहे. डिजिटल ग्राहकसेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी नेतृत्व यामुळे श्री. लोकेश चंद्र यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button