
४७ शेतकऱ्यांना दोन हजार क्विंटल मक्याचा फटका
रावेर (प्रतिनिधी): शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेले रावेर येथील मक्याचे खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे तालुक्यातील ४७ शेतकऱ्यांचा सुमारे दोन हजार क्विंटल मका खरेदीविनाच अडकून पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरेदी केंद्र सुरू असताना शेतकऱ्यांनी आपला मका शासनाकडे विक्रीसाठी आणला होता. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना आता मका विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
काही शेतकऱ्यांचा मका अनेक दिवसांपासून गोदामात पडून असून त्याचे वजन कमी होणे, दर्जा घसरणे तसेच बाजारभाव घटण्याचा धोका वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
खरेदी केंद्र तातडीने पुन्हा सुरू करावे तसेच अडकलेला मका शासनाने त्वरित खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.



