
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी): समाजाप्रती कृतज्ञतेची भावना जपत सुरू करण्यात आलेला ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम आज सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
कोरोना काळात या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. गरजूंसाठी केवळ अन्नधान्याचे वाटप न करता दिवसातून दोन वेळचे पौष्टिक भोजन देण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात आली. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत या उपक्रमांतर्गत एकूण ३१,३८,७७९ ‘स्नेहाची शिदोरी’ पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे.
अशोक जैन यांनी १२ डिसेंबर २०२० रोजी भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनी ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची घोषणा केली होती. जळगाव शहरात कोणीही उपाशी राहू नये, हा भवरलालजींचा ध्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी जैन परिवाराने हा उपक्रम आत्मीयतेने पुढे नेला आहे.
सप्टेंबर २०२५ पर्यंत कांताई सभागृहात दररोज सुमारे १,४०० शिदोरी वितरित केल्या जात होत्या. त्यानंतर ही संख्या दररोज ७०० इतकी ठेवण्यात आली. सकाळी पोळी-भाजी-चटणी, तर संध्याकाळी पौष्टिक खिचडी असा शिदोरीचा समावेश असतो. सणासुदीच्या काळात विशेष भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते.
जैन हिल्स येथील ‘राजाभोज’ भोजनालयातून पहाटे चार वाजल्यापासून शिदोरी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. अन्नाची गुणवत्ता, चव आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. या उपक्रमाचा लाभ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक, बंदोबस्तावरील पोलीस तसेच एसटी चालक-वाहक यांना होत आहे.
कोट:
“समाजाकडून भरभरून घेतो, म्हणून समाजासाठी कृतज्ञतेने काहीतरी परत दिले पाहिजे—या भावनेतून सुरू झालेली ‘स्नेहाची शिदोरी’ आज माणुसकीचा आधार ठरत आहे.”




