जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

आंतर-जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या संपन्न

(मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत युवकांमध्ये एकता व विविधतेची भावना अधिक दृढ)

जळगाव (प्रतिनिधी): मेरा युवा भारत, जळगाव यांच्या वतीने भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दिनांक 18 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आंतर-जिल्हा युवा देवाण-घेवाण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या पाच दिवसीय कार्यक्रमात मुंबई जिल्ह्यातील 37 युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक समन्वय आणि नेतृत्वगुणांचा विकास साधणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या दरम्यान खानदेशचा इतिहास, अहिराणी भाषा व तिचे महत्त्व, खानदेशातील खाद्यसंस्कृती, ताण-तणाव व्यवस्थापन, अमली पदार्थांविषयी जनजागृती तसेच विकसित भारत 2047 या विषयांवर विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.

तसेच सहभागी युवकांना सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस, अजिंठा लेणी, आश्रमशाळा, ग्रामपंचायत तसेच कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे शैक्षणिक भेटी देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती रॅलीतही युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

समारोप कार्यक्रमात सहभागी युवकांनी जळगाव जिल्ह्याच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी क्षेत्र, स्थानिक खाद्यसंस्कृती व लोककला यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपप्रसंगी श्री. व्ही. एम. रोकडे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना यांनी युवकांना पर्यावरण संवर्धनासोबत सांस्कृतिक जतनाचे महत्त्व पटवून दिले. श्री. जयदीप पाटील यांनी विकसित भारत 2047 या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका अधोरेखित केली. तर श्री. अभिषेक चवरे, जिल्हा युवा अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास राजू गावरे (जिल्हा समन्वयक, एनएसएस), श्री. के. दांडे, श्री. पी. चव्हाण (एनएसएस कार्यक्रम अधिकारी) उपस्थित होते. तसेच कमलेश सोनवणे, चेतन पाटील, तुषार साळवे व मुकेश भालेराव या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

हा आंतर-जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून युवकांमध्ये “एकता व विविधता” या मूल्यांची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button