वडिलांच्या निधनाच्या दुःखातही दहावीचा पेपर; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन दिला धीर

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला येथे इयत्ता दहावीत शिकणारी धनश्री भिकाजी पवार हिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग शुक्रवारी उद्भवला. दहावीचा मराठीचा पहिला पेपर असतानाच सकाळी तिचे वडील भिकाजी पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरावर शोककळा पसरली आणि अंत्यविधीसाठी नातेवाईक व शेजारी जमा झाले.
धनश्रीचा पहिलाच पेपर बुडू नये आणि तिच्या वडिलांचे स्वप्न अधुरे राहू नये, या भावनेतून प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी धनश्रीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना समजावले व अंत्यविधी काही काळ पुढे ढकलण्याची विनंती केली. धनश्रीला धीर देत तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसवले.
तिच्या परिस्थितीचा विचार करून शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना संपर्क साधण्यात आला. त्यांनी केंद्रप्रमुख गीता सादुल यांना धनश्रीला अर्ध्या वेळेत परीक्षा सोडण्याची परवानगी देण्याबाबत सूचना केल्या. शिक्षणाधिकारी जगताप स्वतः परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून धनश्रीला धीर देत तिची विचारपूस केली.
दीड तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनाने अंत्यविधीसाठी नेले. या प्रसंगी धनश्रीच्या धैर्याने नातेवाईक, शेजारी, शिक्षक व संस्थाचालक यांचे डोळे पाणावले. संवेदनशीलता, मानवता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकास्पद ठरला.




