शेतकरीजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित

टोमॅटो पीक परिसंवाद उत्साहात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी): जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टोमॅटो पीक परिसंवाद’ आयोजित करण्यात आला. हा परिसंवाद अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे–मुडी रोडवरील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वसंत पाटील यांच्या शेतात पार पडला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या परिसंवादात टोमॅटो रोपांची योग्य निवड, पूर्व मशागत, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन, फर्टिगेशन तसेच ऑटोमेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या परिसंवादास सिक्कीम येथील कृषी विद्यापीठातील फलोत्पादन विषयातील २० कृषी अभ्यासकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात शेतकऱ्यांचे दैवत बळीराजा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

कागोमे इंडिया प्रा. लि.चे कृषी तज्ज्ञ कल्पेश पाटील यांनी बदलते हवामान व उत्पादकतेवर होणारा परिणाम स्पष्ट करत योग्य निगा, बेसल डोस, मल्चिंग तसेच फळांच्या साईजबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांनी तांत्रिक सत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खत व पाण्याचे काटेकोर नियोजन आणि जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे महत्त्व सांगितले. उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भरघोस उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

यावेळी श्रीराम पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत कांदा व टोमॅटो ही पिके नियोजनबद्ध पद्धतीने घेतल्यास अधिक फायदेशीर ठरू शकतात, असे सांगितले.

कार्यक्रमाला कागोमे इंडिया जपानच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख हेंनरीज शिमुकावा यांनी मार्गदर्शन केले. कागोमे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलन चौधरी यांनी त्यांच्या भाषणाचा अनुवाद केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन टोमॅटो वाणांची माहिती देत भविष्यात वाढणाऱ्या टोमॅटो मागणीची पूर्तता करण्याची संधी शेतकऱ्यांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदा पेरणी यंत्र, कांद्याची शाश्वत शेती तसेच हमी भाव याबाबतही तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कंपनीच्या करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी गहू, हरभरा, मका व कपाशीच्या तुलनेत टोमॅटो व कांदा ही पिके अधिक फायदेशीर कशी ठरतात, याबाबत सविस्तर माहिती दिली. माती व पाणी परीक्षण करून जमिनीतील घटकांची कमतरता दूर केल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक उन्नती साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टोमॅटोवर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करणाऱ्या कागोमे इंडियाच्या भारतातील गेल्या १६ वर्षांच्या संशोधन व विकास कार्याचा आढावा मिलन चौधरी यांनी घेतला. शेतकऱ्यांनी पिकातील कोणतीही अडचण असल्यास झाडाचा फोटो पाठवावा, त्यावर तातडीने उपाय सुचवले जातील, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी करार शेती विभागाचे सहकारी श्रीराम पाटील, आशुतोष माळी, कंपनीचे वितरक सुरेश इलेक्ट्रिकलचे संचालक श्रीपाल झाबक, तसेच प्रगतशील शेतकरी चंद्रकांत पाटीलडी. डी. पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. सोळंकी यांनी केले, तर आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button