ताज्या बातम्याराष्ट्रीय-राज्यविकास

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआय प्रभावी ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी): कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा प्रभावी वापर करून अन्नसुरक्षा, हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 अंतर्गत ‘AI in Agriculture’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नितेश राणे यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, जागतिक बँक, संशोधन संस्था व विविध तज्ज्ञ उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या शेतीसमोर अनिश्चित हवामान, पाण्याची घटती पातळी, जमिनीचा दर्जा, पुरवठा साखळीतील अडथळे आणि बाजारातील अनिश्चितता अशी अनेक आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतकऱ्यांसाठी निर्णयक्षमता वाढविणारे महत्त्वाचे साधन ठरू शकते.

भारतामध्ये सुमारे निम्मी लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या शेतीशी जोडलेली असली तरी, हवामान, निविष्ठांचे दर, बाजारभाव व वित्तपुरवठ्याची अचूक माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी एआय उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

एआयच्या माध्यमातून हवामान बदल, सिंचन, खतपुरवठा, बाजारभाव आणि पुरवठा साखळी याबाबत अचूक व वेळीच माहिती मिळू शकते. मात्र, एआय ही जादूची कांडी नसून विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि उत्तरदायित्व यावर आधारित वापर आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने ‘महाॲग्री एआय धोरण’ स्वीकारले असून त्याअंतर्गत विकसित करण्यात आलेला बहुभाषिक मोबाईल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला, बाजारातील घडामोडी, हवामानाविषयी सूचना तसेच शासकीय योजनांची माहिती देत आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, शेतकरी एआय-आधारित तंत्रज्ञान स्वीकारण्यास सज्ज असल्याचे यावरून स्पष्ट होते.

शेतीशी संबंधित विविध डेटाचे एकत्रीकरण करून त्याच्या आधारे शेतकरी व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काम करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button