
पोलीसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून फसवणूक करणाऱ्यांनी नागरिकांना गंडा घालण्यासाठी नवे-नवे मार्ग शोधले आहेत. केवळ एका क्लिकवर नागरिकांच्या बँक खात्यातील लाखो रुपये गायब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या सायबर गुन्हेगार बनावट लिंक, फेक मोबाईल अॅप्स, केवायसी अपडेट, बँक खाते बंद होण्याचा संदेश, लॉटरी किंवा बक्षिसांचे आमिष, तसेच सरकारी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे खोटे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा लिंकवर क्लिक करताच मोबाईल किंवा संगणकातील संवेदनशील माहिती हॅक होऊन बँक खात्यातून रक्कम काढली जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि ई-मेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे संदेश मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये नागरिकांना बनावट कस्टमर केअर नंबरवर फोन करण्यास सांगून ओटीपी किंवा बँक तपशील विचारले जात आहेत. यामुळे अनेकांनी आपल्या आयुष्याची कमाई गमावली आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खात्री करावी, तसेच ओटीपी, एटीएम पिन किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. बँक किंवा सरकारी यंत्रणा कधीही फोनवरून वैयक्तिक माहिती मागत नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांची जागरूकताच सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचा सर्वात मोठा उपाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.




