स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्रचा देशात प्रथम क्रमांक

८७.५७ लाख स्मार्ट मीटरची नोंद; महावितरणची प्रमुख कामगिरी – लोकेश चंद्र
जळगाव (प्रतिनिधी) : ग्राहकांना अचूक व पारदर्शक वीजबिलासह आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशात महावितरणने बसविलेल्या ८५.८५ लाख स्मार्ट मीटरचा मोलाचा वाटा असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा परिवर्तनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून सौर कृषी पंप बसविण्यासह विविध ऊर्जा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविले आहे. आता स्मार्ट मीटर बसविण्यातही राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.
महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसविले जात असून त्यामधून १०० टक्के अचूक बिल, दर तासाला वीज वापराची माहिती मोबाईल ॲपवर मिळणे, सवलतीच्या कालावधीत वीज वापराचे नियोजन करणे आदी लाभ ग्राहकांना मिळत आहेत. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वापरासाठी प्रती युनिट ८० पैसे ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) सवलत देण्यात येत आहे. तसेच औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरासाठी सवलत दिली जात आहे.
१० फेब्रुवारीपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र (८७.५७ लाख) प्रथम, बिहार (८६.४४ लाख) दुसऱ्या तर उत्तर प्रदेश (८२.७५ लाख) तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात ९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत टीओडी सवलतीमुळे ५४.४२ लाख घरगुती ग्राहकांना ५१.४२ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. याशिवाय औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांना मिळून २१५.३५ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली असून उच्चदाब ग्राहकांना १३४९ कोटी रुपयांचा टीओडी लाभ मिळाल्याची माहिती महावितरणने दिली.
स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची स्वयंचलित नोंद होत असल्याने बिलिंग तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून राज्यात बिलिंग तक्रारींचे प्रमाण अर्धा टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते, या गैरसमजाला तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील सर्व ३०,१६४ वीज फीडर तसेच २.८० लाख वितरण ट्रान्सफॉर्मरवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामुळे वीज वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊन वीजगळती रोखणे, अचूक ऊर्जा लेखापरीक्षण व भविष्यातील वीज मागणीचे योग्य नियोजन शक्य होणार आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनी मोबाईल ॲप डाउनलोड करून आपला वीज वापर नियमित तपासावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.



