जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद; आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी): जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जळके-वावडदा येथे ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ उत्साहात पार पडला. वावडदा-जळके रोडवरील प्रगतशील शेतकरी सुधाकर ओंकार येवले यांच्या शेतात झालेल्या या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परिसंवादात टोमॅटो रोपांची योग्य निवड, पूर्व मशागत, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन, फर्टिगेशन, ऑटोमेशन आदी विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शास्त्रीय नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांसह देण्यात आली. शासनाच्या विविध अनुदान योजनांबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतातील प्रात्यक्षिकांमुळे तंत्रज्ञानाची अंमलबजावणी अधिक सुलभ असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास कागोमे इंडिया जपानचे गुणवत्ता नियंत्रण विभाग प्रमुख हेनरीज शिमुकावा, वरिष्ठ व्यवस्थापक मिलन चौधरी, जैन फार्म फ्रेश फूड्स लि.चे विपणन विभाग उपाध्यक्ष रोशन शहा, गौतम देसर्डा, डी. एम. बऱ्हाटे, व्ही. आर. सोळंकी, पी. के. पाटील, संदीप जाधव, सागर भोये आदी मान्यवर उपस्थित होते.
करार शेती विभाग प्रमुख गौतम देसर्डा यांनी करार शेतीच्या माध्यमातून टोमॅटो उत्पादन आणि बाजारपेठेतील स्थिरता वाढविण्याबाबत माहिती दिली. विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांनी तांत्रिक सत्रात मार्गदर्शन केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान, योग्य खत व्यवस्थापन आणि पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे रोशन शहा यांनी स्पष्ट केले. भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षांपासून जळगाव परिसरात राबविण्यात येणारा हा संयुक्त उपक्रम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असल्याचे हेनरीज शिमुकावा यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाचे भाषांतर मिलन चौधरी यांनी केले. भारतात टोमॅटो संशोधन व विकास क्षेत्रात कागोमे इंडियाकडून गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्ही. आर. सोळंकी यांनी केले.
छायाचित्र ओळ: टोमॅटो पिक परिसंवादाचे उद्घाटन करताना हेनरीज शिमुकावा, मिलन चौधरी, डी. एम. बऱ्हाटे, रोशन शहा, गौतम देसर्डा, पी. के. पाटील, व्ही. आर. सोळंकी.




