तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र-वाकायामा सहकार्याला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांत (जपान) यांच्यात तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन्ही प्रदेशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
ताजमहल पॅलेस हॉटेल येथे जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल इजुमी मियाझाकी यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत कोजी यागी, तसेच वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष फुमिनारी अकिझुकी यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही भारताची आर्थिक व सांस्कृतिक राजधानी असून ‘सिस्टर स्टेट’ म्हणून महाराष्ट्र आणि वाकायामा यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 2013 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे 2023 मध्ये नूतनीकरण करण्यात आले असून, या कालावधीत सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अजिंठा परिसरात सुविधा उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याचा उल्लेख केला. 2023 मध्ये वाकायामाच्या दिवंगत राज्यपालांच्या उपस्थितीत सुमो पथकाने मुंबईत भेट देत Gateway of India येथे सुमो आणि भारतीय कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर केले होते. सध्या जपानी सुमो खेळाडू पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जपानचे दिवंगत पंतप्रधान Shinzo Abe यांच्या कार्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले. मुंबईत 40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो आणि 22 किमी लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
नागपूरमध्ये बामियान बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती
अफगाणिस्तानातील बामियान येथील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला. नागपूर हे डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेले ऐतिहासिक ठिकाण असल्याने या उपक्रमातून जागतिक शांततेचा संदेश जाईल, असे त्यांनी सांगितले.
संबंध नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार
राज्यपाल इजुमी मियाझाकी यांनी 2028 मध्ये कराराचे नूतनीकरण करून नव्या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याचा मानस व्यक्त केला. पर्यटन, अन्न प्रक्रिया, क्रीडा, सांस्कृतिक देवाणघेवाण, जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन तसेच व्यापार-उद्योग क्षेत्रात सातत्याने सहकार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा जपानला भेट द्यावी, विशेषतः कोयासन आणि वाकायामातील निसर्गरम्य स्थळांना भेट द्यावी, असे निमंत्रण देत राज्यपालांनी भविष्यातील सहकार्याबाबत आशावाद व्यक्त केला.



